गुढीपाडव्याच्या बरोबर आठव्या दिवशी लेंगरे गावाचा उरूस असतो.गुढीपाडव्याच्या दिवशी लेंगरे गावात बैलाच्या शिवळा असतात.कलंदर बाबाच्या टेकडीवर गावातील बैलांच्या शिवळा पळविल्या जातात.लेंगरे गावाच्या पंचक्रोशीतील लोक पाडव्याच्या शिवळा पाहण्यासाठी येतात व त्या दिवसापासून लेंगरेकराना व लेंगरे पंचक्रोशीतील लोकांना लेंगरे यात्रेची म्हणजे उरूसाची ओढ लागते.खानापूर तालुक्यातील मोठी यात्रा असल्यामुळे व बैलाच्या गाड्यांसाठी प्रसिद्ध असणारी यात्रा असल्यामुळे लोकांना यात्रेची ओढ अधिक असते.
लेंगरे गावाच्या बाहेर गेलेले अनेक गलाई बांधव ,नोकरी कामा निम्मित बाहेर गावी असणारे लोक आवर्जून लेंगरे यात्रेला उपस्थित रहातात. गुढीपाडव्यानंतर यात्रेचा बहर चालू होतो. यात्रेतील मानाचा समजला जाणारा गलफाचा मान सांगली जिल्हा परिषद चे माजी सदस्य खानापूर पंचायत समिती चे माजी सभापती स्वर्गीय जालिंदर(बापू)हरिबा शिंदे (पाटील) यांच्या घरात असतो .जालिंदर बापू हे सांगली जिल्ह्यातील शांत संयमी दिलदार व्यक्तिमत्व ,देवमाणूस म्हणून प्रसिद्ध होते .सध्या बापूचा मोठा मुलगा मच्छिंद्रनाथ जालिंदर शिंदे पाटील (आप्प्पा) यांचे कडे गलफाचा मान आहे.
तसेच मानाचा गाडा पळविण्याचा व पाहटेच्या मानाच्या गाड्याच्या मान खालची पाटील आळी श्री .श्रीरंग (आण्णा) शिंदे यांच्या भावाकीचा व लिंबाजी पाटलाच्या आळीचा मान आहे.तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाजातील व्यक्तींना यात्रे मध्ये मान देवून सर्वांच्या सहकार्याने यात्रा मोठ्या दिमाखात पार पडली जाते. यात्रा कमिटी मध्ये श्री मधुकर पाटील (आप्पा) यांचे ही योगदान मोलाचे असते.
उरुसाचा पहिला दिवशी म्हणजे संदल दिवशी लेंगरे करांच्या अनेक जणाच्या घरी कंदुरी असते. गावातील यात्रेला येणाऱ्या पाहुण्यांना कंदूरी निमित मटण चारून स्वागत केले जाते. कलंदर बाबाचे नवस म्हणून संदल निमित्त बोकड कापून त्यांचा नैवद्य कलंदर बाबाला दाखविला जातो. फकीर जेवणासाठी बोलविले जातात.त्याच दिवशी सायंकाळी लेंगरे येथील प्रसिद्ध बँड पथक यांचा व भजनी मंडळ यांचा कार्यक्रम असतो . तसेच रात्री लोकनाट्य तमाशा असतो. ती रात्र लेंगरेकर जागून काढतात. यात्रेच्या मुख्य दिवशी पाहटे चार वाजता कलंदर बाबाला गलफ व चादर चाढविण्यासाठी गावातील सर्व लोक एकत्रीत जातात. गलफा समोर अतिशय रोमांचक असे विविध खेळ , धाडशी प्रकार केले जातात. कवाली गायली जाते . मोठ्या दिमाखाने कलंदर बाबांना चादर चाढवली जाते. गाण्याचे आवाज फुलांच्या चादरा,अगराबतीच्या वास व कलंदर बाबा की दोन चार हो धिंग च्या घोषाने लेंगरे पेठ दणाणून निघते.
गलफ व चादरच्या मागे मानाचे गाडे असतात. पहाटेचे मानाचे गाडे वाजत गाजत कलंदर बाबाच्या टेकडी वर जातात. व त्या ठिकाणी मोठ्या दिमाखात जोशात पळविले जातात. हजारो लेंगरे करांच्या डोळ्यांचे पारणे फिटले जाते. त्यानंतर यात्रेच्या मुख्य दिवशी कलंदर बाबा टेकडी वर दुपारी दोन पासून गाडे पाहण्यासाठी गर्दी होते. चार वाजे पर्यंत बैलांचे गाडे वाजत गाजत कलंदर बाबा टेकडी पर्यंत येतात. वर्षभर बैलांना चंदी चारून शेतकरी मेहनतीने बैलांची काळजी घेत असतात. त्या बैलांना वाजत गाजत टेकडी वर आणले जाते. कलंदर बाबा टेकडीवर गाडे मोठ्या दिमाखात जोशात आनंदात पळविले जातात. गाडा सरळ गेला की गाडा मालक एकदम खुश होतो. व आनंदाने आपला फेटा हवेत फेकतो. अन वर्षभर गाडा सरळ गेल्याची चर्चा गावभर चालु असते. यात्रेला लेंगरे पंचक्रोशीतील भुड ,माधळमुठी, वाळूज, देविखिंडी, व अनेक आसपासच्या गावातील लोकही आपली बैले कलंदर बाबाच्या टेकडीवर पळविण्यासाठी आणतात. अश्या प्रकारे यात्रेचा मुख्य दिवस पार पडतो. यात्रेला मुलांना अनेक खेळणी पाळणे व विविध विक्रेते याचे स्टाल असतात. त्यामुळे सर्व गाव फुलून निघते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भव्य असे कुस्तीचे मैदान कलंदर बाबा कुस्ती आखाड्यात भरते. महाराष्ट्रातील अनेक मात्तबर मल्ल लेंगरेच्या कुस्ती आखाड्याला हजेरी लावतात. लेंगरे गावातील अनेक लोकांना कुस्तीची प्रचंड आवड आहे. श्री.प्रशांत सावंत , साहेबलाला शेख,प्रकाश कदम व त्यांचे सहकारी, कुस्तीची आवड असणारी मंडळी लेंगरे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतात. पारंपारिक कुस्ती, लाल मातीतली कुस्ती अजून लेंगरे गावाने जपली आहे. ग्रामीण भागाच्या संस्कृतीची जपणूक खऱ्या अर्थाने लेंगरे यात्रेमुळे होत आहे. तसेच यात्रेमध्ये विविध कला, भजन, पोवाडे, लोकनाट्य तमाशा, बैलांच्या शर्यती व लेंगरे कराकडून केला जाणारा पाहुणचार, हिंदू मुस्लिम ऐक्य हे भारतामधील ग्रामीण संस्कृतीचे जपण्याचे मोठे काम लेंगरे उरुसा मुळे होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप पाहायचे असेल तर लेंगरे उरुसाला नक्की या.
लेंगरे गावचा उरूस हा ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप आहे.
लाल शाहा बाज की दोन चार हो धींग !
श्री.सोमनाथ मुरलीधर शिंदे ( गुरुजी)
No comments:
Post a Comment